
नाशिक। दि. १८ ऑगस्ट २०२५: मखमलाबाद, पंचवटी या भागात फिरून दुकानदारांना पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्याकडून बळजबरीने पैसे उकळत दहशत माजविणारा संशयित सराईत गुन्हेगार किरण सुखलाल केवर (२५) यास खंडणी विरोधी पथकाने जाळ्यात घेतले.
तडीपार असतानाही कंबरेला गावठी पिस्तूल लावून मखमलाबाद परिसरात केवर हा परिसरात फिरत होता. खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून त्यास बेड्या ठोकल्या. खंडणी पथकाचे अंमलदार दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप यांना केवर हा गावठी पिस्तूलसह फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे आदींच्या पथकाने मखमलाबाद गाठले. तेथे केवर हा आढळून आला. पथकाने त्यास ताब्यात घेतल्यावर अंगझडतीत एक गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.