
नाशिक। दि. १७ सप्टेंबर २०२५: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्यानंतर तोटा झाल्याने दोघा तरुणांनी चक्क चोरीचा फंडा अवलंबला. मात्र, चोरीच्या पहिल्याच प्रकारात ते पोलिसांच्या तावडीत सापडले. अटकेतील संशयित चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात शिरून एक लाख दहा हजार रुपये किमतीची १०.६५० ग्रॅमची सोनसाखळी ओरबाडून धूम ठोकली होती.
उपनगर, जेलरोड भागात हे दोघे चोरटे येणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्याप्रमाणे सापळा रचून दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक माहितीचा आधार घेऊन चोरट्यांचा शोध घेण्यात आला. प्रथमेश नितीन उशीर (२२, रा. टाकळी रोड, शांतापार्क) तसेच नोएल डॅनियल म्हस्के (१९, रा. विठ्ठल मंगल कार्यालय, जेल रोड) यांना ताब्यात घेण्यात आले. पंचवटी पोलिस ठाण्यात १० सप्टेंबरला चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
रामवाडी येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पायी चालणाऱ्या महिलेचा घरापर्यंत पाठलाग करून चोरट्यांनी महिलेच्या घरात शिरून गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून धूम ठोकली होती. गुन्हे शाखा युनिट १ चे पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, नाजीमखान पठाण, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशी, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, अमोल कोष्टी, मुक्तार शेख या पथकाने संशयित चोरट्यांना अटक केली. चोरट्यांनी महिलेकडून पाणी मागितले. पाणी देऊन महिला माघारी फिरताच चोरट्यांनी तिच्यामागे घरात घुसून सोनसाखळी खेचून धूम ठोकली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
![]()

