
नाशिक। दि. १६ डिसेंबर २०२५: बंदी असलेल्या नायलॉन मांजाची चोरीछुप्या पद्धतीने जय भवानी रोड परिसरातील जगताप मळा भागात विक्री करण्यासाठी आलेल्या एका युवकाला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून नायलॉन मांजाचे ६६ गट्टू व सात फिरक्या जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित यश काळे यास पोलिसांनी अटक केली आहे.
नायलॉन मांजाची खरेदी-विक्री, वापर, साठवणुकीवर पोलिस आयुक्तांनी बंदी घातली आहे. तरीसुद्धा काही जण चोरट्या मार्गे नायलॉन मांजा, चायनीज मांजाची विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. गुन्हे शाखा युनिट -२च्या पथकाचे उपनिरीक्षक मुख्तारखान पठाण व सहायक उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यांनी पथकाचे प्रभारी- सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांना कळविले. तोडकर यांनी पथक सज्ज करून सापळा रचण्याची सूचना केली. यानुसार पथकाने जगताप मळा येथे सापळा रचून एका गोणीत नायलॉन मांजाचे गट्ट भरून विक्रीच्या उद्देशाने आलेल्या काळे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
![]()

