
नाशिक। दि. १५ जुलै २०२५: गंगापूर रोडवरील एका डिझायनर कपड्यांच्या दुकानातील विकलेल्या मालाची रक्कम भागीदाराने परस्पर आपल्या खात्यात घेऊन दुकानातील ३० लाख रुपये किमतीचा मालाचा परस्पर अपहार केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महेश हरी उदावंत, (वय: ३५ वर्षे, व्यवसाय: व्यापार, रा. नाशिकरोड, नाशिक) त्यांचा भाऊ रोहित उदावंत व युसूफ अहमद शेख यांचे भागीदारीमध्ये सुमारे सहा वर्षापासुन प्रसाद सर्कल, गंगापुररोड वरील, ओम शिवालया बिल्डींगमध्ये कपड्यांचे दुकान आहे.
दिनांक १२ जुलै २०२५ रोजी फिर्यादी महेश हरी उदावंत यांनी गंगापुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, दिनांक १४ मे ते दिनांक ९ जुलै दरम्यान त्यांचे भागीदार असलेले संशयित युसूफ अहमद शेख यांनी दुकानातील विकलेल्या मालाची रक्कम दुकानातील सर्व सीसीटीव्ही बंद करुन संस्थेच्या बँक खात्यात न घेता स्वत:च्या वैयक्तिक बँक खात्यावर घेवुन फिर्यादी यांचा विश्वासघात करुन फसवणुक केली. तसेच संशयित युसूफ अहमद शेख त्याचा भाउ आरिफ शेख व एक महिला अशांनी संगनमत करुन दुकानातील सियाराम, रेमंड व इतर कंपनीचे शुटिंग, शर्टंग तसेच ब्लेझर, शेरवानी व जोधपुरी असा ३० लाख रुपये किंमतीचा माल फिर्यादीचे संमतीशिवाय अप्रामाणिकपणे लबाडीच्या इरादयाने घेवुन गेला होता. म्हणुन गंगापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १७४/२०२५)
सदरचा गुन्हा दाखल होताच गंगापुर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जग्वेंद्रसिंग राजपुत यांनी गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदार, तसेच खंडणी विरोधी पथकातील अंमलदार अशांना गुन्हयातील आरोपीताचा शोध घेणेबाबत आदेशित केले. त्यावरुन पोलीस पथकाने गुन्हयातील आरोपींचा व अपहारित मालाचा देवळाली कॅम्प परिसरात जावुन अहोरात्र शोध घेतला. परंतु पोलीस पथक पोहचण्याच्या आत संशयित आरोपींनी त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावुन मोबाईल फोन बंद करुन अज्ञात ठिकाणी पलायन केले होते.
पोलीस पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर करुन संशयित आरोपी: युसूफ अहमद शेख (राहणार घर नंबर: १५६, चंद्रविजय सोसायटी, लक्ष्मणनगर, लोखंडेमळा, जेलरोड, नाशिक व त्याचा भाऊ संशयित आरिफ शेख अशांना देवळाली कॅम्प परिसरातुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी अपहारित केलेला ३० लाख रुपये किंमतीचा शुटिंग शर्टींग कापडाचा माल हा इगतपुरी परिसरात लपवुन ठेवल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी गंगापुर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक भटु पाटील, पोलीस हवालदार गिरीष महाले, पोलीस अंमलदार राकेश राउत, सुजित जाधव, सोनु खाडे, गोरख साळुंके, तुळशिदास चौधरी, घनश्याम भोये, मुकेश गांगुर्डे, तुषार मंडले, पोलीस नाईक: गौरव खांडरे तसेच खंडणीविरोधी पथकाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस नाईक: मंगेश जगझाप, रविंद्र दिघे, भुषण सोनवणे, चारुदत्त निकम यांच्या पथकाने केली.