नाशिक (प्रतिनिधी): दहीपुलावरील साडीच्या दुकानाच्या गल्ल्यातून तब्बल १ लाख रुपयांची रोकड लांबविणाऱ्या बंटी बबलीला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट १ ला यश आलं आहे. या बंटी बबलीला पोलिसांनी इंदिरानगर येथून अटक केली आहे.
या घटनेत दुकान मालकास बोलण्यात गुंतवून भामट्या बंटी बबलीने गल्ल्यातील एक लाख १० हजाराची रोकड पळविली होती. याप्रकरणी चेतन पृथ्वीराज बेदमुथा (रा.लामखेडमळा,तारवालानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. बेदमुथा यांचे दहिपूल परिसरात दर्पण साडीज नावाचे दुकान आहे. गेल्या मंगळवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास अनोळखी दांम्पत्य साडी खरेदीसाठी दुकानात आले होते. बेदमुथा हे साड्या दाखवित असतांना दांम्पत्याने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांचे लक्ष विचलीत करीत ही चोरी केली.
या प्रकरणाचा तपास करत असतांना गुन्हे शाखा युनिट १ चे हवालदार प्रशांत मरकड आणि संदीप भांड यांना गुप्त माहिती मिळाली होती की, सदर दाम्पत्य इंदिरानगरच्या रथचक्र चौकातील रिव्हॅली अपार्टमेंट मध्ये राहत आहेत. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचला आणि वेलसन उर्फ लकी प्रेमविलास मोहिते (वय: ३५) आणि पल्लवी शीतल वाईकर (वय: ३५) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी या चोरीची कबुली दिली. तसेच चोरी केलेली रक्कम कपाटाच्या लॉकरमधून काढून दिली. दोघांनाही अटक करून पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्य मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, रविंद्र बागुल, पोलीस हवालदार: प्रशांत मरकड, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, रमेश कोळी, विशाल काठे, नाझीमखान पठाण, पोलीस अंमलदार: जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, अनुजा येलवे, मनिषा सरोदे यांच्या पथकाने केली आहे.