

नाशिक। दि. १५ जानेवारी २०२६: नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांकडून कडक कारवाई सुरू असतानाच गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ने पंचवटी परिसरात धडक कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत देशी व विदेशी दारू असा एकूण ४३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड व संदीप भांड यांना १४ जानेवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी येथील साईराज लॉन्ड्रीच्या बाजूला असलेल्या बोळीमध्ये भिंतीलगत उघड्यावर अवैधरित्या दारूविक्री सुरू आहे. ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना कळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यात किशोर रामलाल परदेशी (वय ४८, रा. महादेव कॉलनी, मखमलाबाद रोड, नाशिक) हा अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री करताना आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील दारूसाठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत तक्रार दाखल केली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निवडणूक काळात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १५/२०२६)
सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक: चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाठ, पोलीस हवालदार: प्रविण वाघमारे, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, मिलींदसिंग परदेशी, विशाल काठे, विशाल देवरे, नाझीमखान पठाण, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, रोहिदास लिलके, रमेश कोळी, उत्तम पवार, महेश साळुंके, पोलीस अंमलदार: मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, राम बर्डे, महिला पोलीस अंमलदार: अनुजा येलवे, शर्मिला कोकणी, मनिषा सरोदे तसेच पंचवटी पोलीस ठाणे कडील हवालदार: संतोष पवार, जयवंत लोणारे, अकुंश काळे अशांनी संयुक्तरित्या केलेली आहे.
![]()


