
नाशिक | 14 मे 2025: नाशिक शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कारवाई करत मॅफेड्रॉन (एमडी) या घातक अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघा तरुणांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण १,७७,२३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. माहितीप्रमाणे संशयित साहिल उर्फ विवेक अनिल गांगुर्डे (वय २४) व अमित उर्फ अभि नितीन पाटील (वय २०) हे दोघे पवननगर सिडको परिसरातील असून, अंबड लिंक रोडवरील हनुमान मंदिराजवळ मॅफेड्रॉन विक्रीसाठी येणार असल्याचे समजले होते.
पथकाने तत्काळ कारवाई करत योजनाबद्धपणे सापळा रचून या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ०९.५ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन ज्याची किंमत सुमारे ४५,००० रुपये, तसेच मोबाईल व रोख रक्कम मिळून १,३२,२३० रुपये किमतीचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८(क), २२(ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक: सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक: रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, पोलीस हवालदार भारत डंबाळे, पोलीस नाईक सौंदाणे, पोलीस अंमलदार: गणेश वडजे, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, अर्चना भड (सर्व नेमणूक अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर) यांनी केली आहे. शहरात ड्रग्जविरोधी मोहिमेला गती देताना पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्वाची मानली जात आहे.