
नाशिक (प्रतिनिधी): दुचाकी चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने मोतीवाला कॉलेज, ध्रुवनगर येथे ही कारवाई केली. संशयिताकडून चोरीच्या ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे कासीमखान पठाण, अमोल कोष्टी यांना एक जण चोरीची दुचाकी घेऊन ध्रुवनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सापळा रचून विना नंबरच्या दुचाकीवर अडलेल्या संशयिताला कागदपत्रांबाबत विचारले. अधिक चौकशी केली असता मित्राच्या मदतीने शहरात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
३ दुचाकी मित्राच्या घरी असल्याची माहिती दिली. दुसऱ्या पथकाने संशयितांच्या घरी छापा मारत ३ दुचाकी जप्त केल्या. वरिष्ठ निरीक्षक मधुकर डक यांच्या पथकाने ही कारवाई केली. सातपूर, नाशिक रोड येथील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. संशयितांना सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.