
नाशिक | दि. १३ सप्टेंबर २०२५ : शरणपूर रोडवरील सुमती सोसायटीतील कुंथूनाथ जैन मंदिरातील चांदीच्या व पंचधातूच्या मूर्ती, पूजेची भांडी तसेच दोन दानपेट्या चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट क्र. १ च्या पथकाने अखेर जेरबंद केले. गंगापूर रोडवरील आसाराम बापू पुलाजवळ संशयितांना सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ३ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही चोरी ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान घडली होती. मनीष मोदी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान संशयित विशाल बाळू सांगळे (२३, रा. राहुलनगर), शिवा गोपाळ डोंगरे (२३, रा. कामगार नगर, सातपूर) आणि लकी विल्सन भंडारे (१९, रा. शरणपूर, कॅनडा कॉर्नर) अशी अटकेतील संशयितांची नावे स्पष्ट झाली.
अजून दोन गुन्ह्यांचा उलगडा:
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत तिघांनी आणखी दोन चोरींची कबुली दिली. त्यात स्वामी डेव्हलपर्सच्या गंगापूर रोड येथील कार्यालयातून रोख रक्कम चोरण्याचाही समावेश आहे. या प्रकरणी आरोपींकडून ६४ हजार रुपये रोख रक्कम, दीड लाख रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली ८० हजारांची दुचाकी असा एकूण दोन लाख ३० हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, नाजिमखान पठाण, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशी, प्रदीप म्हसदे, रोहिदास लिलके, अमोल कोष्टी, मुक्तार शेख व जगेश्वर बोरसे यांच्या पथकाने केली.
![]()

