नाशिक: खुनाच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

नाशिक। दि. ११ नोव्हेंबर २०२५: शिवाजीनगर परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाचा खून करणाऱ्या आणि गेल्या वर्षभरापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीस अखेर अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा अंबड पथकाने विशेष मोहिम राबवून पुण्यातून त्याला ताब्यात घेतले.

९ मे २०२४ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजीनगर येथील महात्मा फुले उद्यानाजवळ रितेश माथे (२६) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. अरबाज मोहम्मद शेख, संजय (उर्फ अतुल) प्रधान आणि दोन अनोळखी व्यक्तींनी किरकोळ वादाचा राग मनात धरून हा हल्ला केला होता. गंभीर जखमी अवस्थेत रितेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 13 जानेवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

प्राथमिक तपासात संजय उर्फ अतुल प्रधान (रा. श्रमिकनगर, सातपूर), शुभम जाधव (रा. शिवानीनगर, सातपूर) आणि अरबाज शेख (रा. धर्मानी कॉलनी, नाशिक) यांना अटक करण्यात आली. मात्र चौथा संशयित रोहित हूमबहादुर थापा हा गुन्ह्यानंतर फरार झाला होता. इंदौर, रत्नागिरी आणि पुणे अशा विविध ठिकाणी तो बनावट नावाने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना अटक !

अखेर थापा हा पुण्यात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा अंबड पथकाचे प्रभारी उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बावधान पोलिस ठाणे हद्दीतील पायगुडे नगर परिसरात सापळा रचून थापा (वय २२) याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790