
नाशिक, ११ नोव्हेंबर २०२५: ठाणे शहरातील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खून प्रकरणातील फरार संशयित आरोपी बसने चाळीसगाव (जि. जळगाव) येथून नाशिककडे येत असल्याची गोपनीय माहिती इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचत बस नाशिकमध्ये दाखल होताच जत्रा हॉटेलजवळ थांबवून सहाही संशयितांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी (१० नोव्हेंबर) करण्यात आली.
गोपनीय माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी तातडीने पथकाला कारवाईचे आदेश दिले. चाळीसगाव एसटी डेपोशी संपर्क साधून बसचा क्रमांक मिळवण्यात आला आणि शहरात रणनीती आखून सापळा लावण्यात आला. त्यानंतर बस थांबवून आरोपींची पडताळणी केली असता वर्णनाशी जुळत असल्याने सर्व संशयितांना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमर राजेश महाजन (३६, दूध विक्रेता, रा. विश्वनगर, डोंबीवली प.), अक्षयकुमार शंकर वागळे (२६, व्यावसायिक, रा. दावळी रोड, डोंबीवली पू.), अतुल बालू कांबळे (२४, रिक्षाचालक, रा. कुंभारखान पाडा, डोंबीवली प.), नीलेश मधुकर ठोसर (४२, खाजगी नोकरी, रा. बदलापूर पू.), प्रतीकसिंग प्रेमसिंग चौहान (२६, व्यावसायिक, रा. अहिरे रोड, डोंबीवली पू.) आणि लोकेश नितीन चौधरी (२४, रिक्षाचालक, रा. सरोवर नगर, डोंबीवली प.) यांचा समावेश आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष फुंदे तसेच कर्मचारी कुलदीप पवार, अमजद पटेल आणि पवन परदेशी यांनी केली.
![]()
