
नाशिक। दि. ९ सप्टेंबर २०२५: गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा तपास पोलिसांनी उलगडला असून या गुन्ह्यातील धक्कादायक बाब म्हणजे पिडीत मुलीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडून आलेल्या डि.एन.ए. अहवालाने हा गुन्हा स्पष्ट झाला आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी:
६ ऑगस्ट २०२५ रोजी अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पिडीत (वय १७) मुलीची प्रकृती बिघडल्याने तिच्या आईने तिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान ती सात आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
प्रारंभी पिडीत व तिची आई यांनी कोणत्याही संशयिताचे नाव सांगण्यास टाळाटाळ केली. उलट उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने तपासात अडथळे येत होते. मात्र प्रकरण अतिसंवेदनशील असल्याने तपास पुढे नेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते.
तपासाची दिशा:
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथके नेमण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम पाटील यांनी पिडीत मुलगी व गर्भाचे डि.एन.ए. नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने १०० पेक्षा अधिक लोकांची चौकशी करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठलाही ठोस पुरावा हाताला लागत नव्हता. याचदरम्यान तपासात पिडीत मुलीचे वडील यांच्यावर संशय गडद होत गेला. त्यांचेही डि.एन.ए. नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले.
धक्कादायक निष्कर्ष:
न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, पिडीत मुलीच्या वडिलांनीच लैंगिक अत्याचार केला असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तो आठ दिवसांपासून घरी न आल्याचे व त्याचा जुना मोबाईलही घरीच सोडून दिल्याचे निष्पन्न झाले. मात्र आरोपी नवीन मोबाईल वापरत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत त्याचा मागोवा घेतला.
शेवटी, आरोपी बिहारचा मूळ रहिवासी असला तरी तो सध्या नाशिकच्या शिवाजीनगर भागात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. सीबीएस परिसरातून त्याला अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) श्रीमती मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे: सहायक पोलीस निरीक्षक पुनम पाटील, निखील पवार, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, प्रियंका कवाद, हवालदार: रविंद्र मोहीते, अंमलदार: मुकेश गांगुर्डे, घनश्याम भोये, मच्छिंद्र वाकचौरे, राकेश राऊत, विजय नवले, तुषार मंडले, रिना आहेर यांच्या पथकाने केली.
![]()

