नाशिक: राका कॉलनी घरफोडीतील चोर दागिन्यांसह ताब्यात; १८०० डॉलर फेकले नदीत…

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): राका कॉलनीतील नवकार रेसिडेन्सीत राहणाऱ्या माजी नगरसेविका डॉ. ममता पाटील यांच्या घरी मंगळवारी (दि. ६) झालेल्या घरफोडीतील तीन सराईतांना सर्व सोन्यासह पोलिसांनी भीमवाडी, गंजमाळ येथून ताब्यात घेतले. पोलिसांना जर १५ मिनिटे उशीर झाला असता तर संशयित पुणे येथे पळून जाण्याच्या तयारीत होते.

ताब्यात घेतलेला संशयित टाक हा पुण्यातून तडीपार होता. तो नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याने त्याने रेकी करून ही घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या घरफोडीतील संशयितांनी १८०० अमेरिकन डॉलर (१,५१,२०९ भारतीय रुपये मूल्य) हे खेळण्याच्या किंवा नकली नोटा समजून त्यांनी नदीत फेकून दिले. तर सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील पुराच्या पाण्यात फेकून दिल्याचे सांगीतले.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, पाटील यांच्या फ्लॅटचे सेफ्टी डोअर आणि दरवाजाचा कडी कोयता तोडून बेडरूममध्ये ठेवलेले दागिने आणि १८०० डॉलर चोरी करण्यात आले होते. पोलिस पथकाने घटास्थळापासून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील ५ ते ६ किमीपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. गंजमाळच्या भीमवाडीपर्यंत माग काढला. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी २५ पोलिसांचे पथक तयार केले. संशयित रहात असलेल्या परिसराला चारही बाजूंनी घेरत गोरखासिंग टाक, दीपक जाधव, अमनसिंग टाक यांना ताब्यात घेतले.

सराईत गुन्हेगार गोरखसिंग गागासिंग टाक हा पुण्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चोऱ्या, घरफोड्या करत होता. २००८ सालापासून २०२१ सालापर्यंत त्याच्यावर पुण्यात १९ गुन्हे दाखल आहेत. तो रक्षाबंधनासाठी गंजमाळ येथे राहणाऱ्या बहिणीकडे आला होता. त्यातच त्याने येथील सराईत गुन्हेगार अमनसिंगला हाताशी धरून मोठ्या घरफोडीचा बेत आखला होता. यासाठी या दोघांनी दीपक जाधव यालाही सोबत घेतले होते. या तिघांनी मिळून राका कॉलनीतील डॉ. ममता पाटील यांचे घर फोडून सुमारे ५७ लाख रुपयांचे दागिने लुटून नेले होते. घरफोड्या करण्यात पटाईत असलेला गोरखसिंग हा या घरफोडीचा मास्टरमाइंड होता.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

त्याचा साथीदार अमनसिंग टाक याच्यावरसुद्धा पंचवटी, इंदिरानगर व सायखेडा पोलिस ठाण्यात यापूर्वी घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे तोदेखील अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी राहिलेला होता.

या दोघांनी मिळून कट रचला अन् शहरातील उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राका कॉलनीतील नवकार रेसिडेन्सीमध्ये मंगळवारी मध्यरात्री दुचाकीने शिरकाव केला. पहिल्या मजल्यावरून हे तिघेही पायऱ्यांनी चालत वर गेले. त्यांना तिसऱ्या मजल्यावर पाटील यांच्या फ्लॅट कुलूपबंद दिसले, तसेच त्यांच्यासमोरील दुसरे फ्लॅटसुद्धा कुलूपबंद होते.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

यावेळी त्यांनी पाटील यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून केवळ सोने व हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि रोख रोकड समजून १८०० अमेरिकन डॉलरच्या नोटांचे बंडल घेत अवघ्या पंधरा मिनिटांत धूम ठोकली. गोरखसिंग याने २०१९ साली पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केली होती.

१८०० अमेरिकन डॉलर नदीत फेकले; का, तर म्हणे…
गोरखसिंग व अमनसिंग यांनी पाटील यांच्या घरातून दागिन्यांसह १८०० अमेरिकन डॉलर असलेल्या नोटांचे बंडलही गायब केले होते. मात्र, त्यांनी नंतर या बंडलवर गांधीजींचा फोटो नाही म्हणून त्या नकली नोटा असल्याचे समजून अमरधामसमोरील टाळकुटेश्वर मंदिराजवळच्या पुलावरून गोदावरी नदीत टाकून दिले, डीव्हीआरसुद्धा नदीत फेकून पळ काढल्याचे तपासात समोर आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790