🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

९ वर्षांपासून फरार असलेला सराईत संशयित अखेर पोलिसांच्या ताब्यात !

नाशिक | दि. ९ डिसेंबर २०२६: फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात मागील नऊ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या मुख्य संशयिताला गुन्हे शाखा युनिट–२ च्या पथकाने अटक केली आहे. संदीप दिनकर खंगाळ (वय ४५, रा. अशोकनगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो २०१७ पासून नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर फरार होता.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह व्यवस्थापनासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बहुला शिवारातील एका महिलेच्या मालकीचा भूखंड बळकावण्यासाठी खंगाळ व त्याच्या सहकाऱ्यांनी सुनियोजित कट रचला होता. मूळ मालक महिलेऐवजी दुसऱ्या एका महिलेला ‘तोतया’ म्हणून उभे करून तिच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाचा खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण करून मूळ मालकाची फसवणूक करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दुखापतीच्या गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींना अटक !

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान तिघा सहआरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, या कटाचा सूत्रधार असलेला संदीप खंगाळ तेव्हापासून फरार होता.

तपासात असेही उघड झाले आहे की, फसवणूक करण्यासाठी संशयितांनी मूळ भूखंडधारक महिलेच्या नावाने बनावट पॅनकार्ड व आधारकार्ड तयार केले होते. तसेच प्लॉटशी संबंधित शासकीय कागदपत्रांमध्येही फेरफार करून भूखंड आपल्या नावावर करून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790