
नाशिक। ८ जुलै २०२५: नोकरीचे आमिष दाखवून व स्वत:ला वकील असल्याचे भासवत फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला अखेर नाशिक पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. समाधान केवलराव जगताप (वय ३७, रा. चौगाव, ता. बागलाण, जि. नाशिक) असे या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलीस नाईक भूषण सोनवणे आणि अंमलदार चारूदत्त निकम यांना समाधान जगताप हा नाशिकमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, खंडणी विरोधी पथकाने सापळा रचला. त्यानुसार, नांदूर नाका येथील वाघ्या मुरळी हॉटेलमध्ये संशयित आरोपीला अटक करण्यात आली.
जगताप याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. चौकशीदरम्यान तो स्वतःला वकील असल्याचे भासवून लोकांना गंडवत असल्याचे उघड झाले आहे. अधिक तपासात त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शिऊर पोलीस ठाण्यात आणि जळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातही फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सध्या आरोपीला पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.