नाशिक। दि. ६ डिसेंबर २०२५: पाथर्डी शिवार परिसरात एम.डी. ड्रग्ज विक्रीचे जाळे युनिट २च्या पथकाने उद्ध्वस्त केले. संशयित शुभम राजेंद्र येवले (२५), रा. लंबोदर हाइट्स, पाथर्डी शिवार याच्याकडून पथकाने तब्बल २ लाख २६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आली आहे.
यात २७ हजार ५०० रुपये किमतीचे ५.५ ग्रॅम ड्रग्ज मिळून आले. रोख रक्कम मोठ्या प्रमाणात सापडल्याने संशयिताने मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवहार केल्याचा पोलिसांना संशय आहे.
गुन्हे शाखेचे हवालदार मनोहर शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की, संशयित शुभम येवले हा आपल्या राहत्या घरात ड्रग्जचा साठा ठेवून विक्री करीत आहे. गुरुवारी (दि. ४) दुपारी साडेतीनच्या सुमारास फ्लॅटवर धाड टाकली. दरवाजा ठोठावल्यानंतर शुभम येवले हा घरात हजर होता. त्याच्याकडे पारदर्शक पिशवीत ५.५ ग्रॅम मॅफेड्रॉन पावडर मिळून आली.
मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, एम. डी. पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ९२ लहान आणि ३१ मध्यम पिशव्या, तसेच १ लाख ४८ हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत शुभम येवलेने अमली पदार्थ कल्याण येथील राहुल नामक एमडी सप्लायरकडून घेतल्याचे सांगितले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ करत आहे.
![]()

