Breaking

नाशिक: जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

नाशिक, दि. ५ एप्रिल २०२६: जुन्या आर्थिक वादातून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला गंभीर मारहाण केल्याच्या प्रकरणात गुंडाविरोधी पथकाने चार संशयितांना अटक केली आहे. मोतीवाला कॉलेज परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

२७ मार्च रोजी रात्री नाशिकरोड येथील नॅशनल लॉजसमोर फिर्यादी महेश तुकाराम गवळी हे बसले असताना आरोपींनी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. त्यानंतर शांती पार्क उपनगरातील एका ओसाड इमारतीत नेऊन चाकू, कोयता व लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच जिवे ठार मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: खंडणी प्रकरणाला वेगळे वळण, फिर्यादीवरच अत्याचाराचा गुन्हा दाखल; १२१ आक्षेपार्ह व्हिडीओ

दरम्यान, आरोपींनी गवळी यांना इमारतीवरून खाली फेकून दिल्याने त्यांच्या पाठीच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान गुंडाविरोधी पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला. रेल्वे स्थानक, बिटको चौक आणि सिटी सेंटर मॉल परिसरातील फुटेज तपासून संशयितांची ओळख पटवण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अंबड-इंदिरानगरातील तक्रारदारांचा ७० लाखांचा मुद्देमाल परत

या प्रकरणी नारायण संभाजी नागपुरे (३२, सातपूर), प्रथमेश संतोष सोनवणे (२१, सातपूर), रवी अशोक शिंदे (२६, आगर टाकळी) आणि अभय रामभाऊ औटे (२३, आंबेडकर नगर) यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाखांची खंडणी मागणाऱ्या ४ जणांना अटक !

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदिप पवार, हवालदार विजयकुमार सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, सुनिल आडके, अंमलदार गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, महिला पोलीस अंमलदार सुनिता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790