
नाशिक। दि. ५ जानेवारी २०२६: ठक्कर बाजार बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत प्रवाशाच्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरण्याचा प्रकार उघडकीस आला असून, गुन्हे शाखा अंबड युनिटने एका महिलेला अटक करून तब्बल ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी अमित अशोक वाघमारे (वय ३८, रा. दिंडोरी) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ३० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते पत्नी व मुलांसह ठक्कर बाजार बसस्थानकातून दिंडोरीकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पत्नीच्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली होती.
गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा अंबड युनिटच्या अधिकारी व अंमलदारांनी मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. दरम्यान, ४ जानेवारी २०२६ रोजी महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, फिकट हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली व तोंडाला पांढरा स्कार्फ बांधलेली एक महिला चोरीचे दागिने विक्रीसाठी पंचवटी परिसरात फिरत असल्याचे समोर आले. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांना कळविण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
पथकाने गणेशवाडी फुलबाजार, पंचवटी येथे सापळा रचून संशयित निर्मला विजय लोंढे (वय ३७, रा. तिरुपती नगर, खर्जुला मळा, टाकळी रोड, नाशिक; मूळ रा. जाजूवाडी कॅम्प, मालेगाव) हिला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान तिच्याकडून एक मंगळसूत्र, कानातील टॉप्सची जोड, एक नेकलेस व एक कानवेल असा एकूण ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत सदर महिलेने चार-पाच दिवसांपूर्वी ठक्कर बाजार बसस्थानकात बसमध्ये चढताना एका महिलेच्या बॅगेची चैन उघडून पर्स चोरल्याची कबुली दिली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिला सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, पोलीस अंमलदार: भगवान जाधव, चारूदत्त निकम व सविता कदम (नेमणूक) अंबड गुन्हे शाखा युनिट यांनी केली आहे. यात तांत्रिक विश्लेषण विभागाच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक जया तारडे व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
![]()


