नाशिक (प्रतिनिधी): शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत नायलॉन मांजा विक्री, वापर व साठा करण्यांवर कडक बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील चोरट्यामार्गे काही युवक नायलॉन मांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांनी कारवाईला वेग दिला आहे.
गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साधुग्राम भागात छापा टाकून एका युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १३२ गट्टू जप्त करण्यात आले आहेत.
नायलॉन मांजा विक्री आणि वापरावर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंदी घातली आहे. नायलॉन मांजा वापरताना किंवा विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे.
आतापर्यंत ७४ विक्रेत्यांना १६ जानेवारीपर्यंत शहरातून पोलिसांनी तडीपारही केले आहे. गुन्हे शाखा युनिट-१चे अंमलदार मुख्तार शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार नाझीम पठाण, धनंजय शिंदे आदींच्या पथकाने साधुग्राम परिसरातील एका मंदिराजवळच्या मोकळ्या जागेत साध्या वेशात सापळा रचला.
याठिकाणी नायलॉन मांजाचे गट्टू घेऊन विक्रीसाठी आलेल्या संशयित सागर दीपक गुरव (२६, रा. पंचवटी) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण १ लाख ३२ हजार रुपये किमतीचे एकूण १३२ गट्टू आढळून आले.