नाशिक | दि. २ सप्टेंबर २०२५: ठक्कर बाजार परिसरात फुटपाथवर एका इसमाची सिमेंटच्या ब्लॉकने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट १ ने तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.
आज (२ सप्टेंबर) दुपारी ठक्कर बाजार बसस्थानकाजवळ ही घटना घडली. मृत इसमाचा अद्याप ठोस तपशील मिळालेला नाही. घटनेची माहिती मिळताच गुन्हेशाखा युनिट-१ चे अधिकारी आणि अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी मेळा बसस्थानक परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कारवाई करत १५ ते १६ वर्षे वयोगटातील तीन अल्पवयीन मुलांना शिताफीने ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान या तिघांनी कबुली दिली की, त्यांच्या सोबत असलेल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या कारणावरून त्यांनी फुटपाथवर पडलेला सिमेंटचा ब्लॉक त्या इसमाच्या डोक्यात मारला आणि त्याचा मृत्यू झाला. सदर विधीसंघर्षित बालकांना पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, संदिप भांड, विशाल देवरे, विशाल काठे, नाझीमखान पठाण, योगीराज गायकवाड, मिलींदसिंग परदेशी, उत्तम पवार, रमेश कोळी, महेश साळुंके, धनंजय शिंदे, रविंद्र आढाव, रोहिदास लिलके, देविदास ठाकरे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, नितीन जगताप, मुक्तार शेख, राम बर्डे, महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाठ, सुकाम पवार यांच्या पथकाने केली.
![]()

