नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गोळीबार, खून, खूनाचा प्रयत्न, विनयभंगाचा मारहाणीसारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अखेर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अटक केली आहे.
त्याच्याकडे देशी गावठी कट्टा व जिवंत काडतुसही हस्तगत करण्यात आले असून, इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या डिसेंबर महिन्यात पवननगर परिसरात हवेत गोळीबार केल्याप्रकरणातही तो असताना त्याच्याविरोधात दोन दिवसांनी गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी पवननगर परिसरातील एक माजी नगरसेवकही त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असल्याची चर्चा शहरभर रंगली होती.
रोहित गोविंद डिंगम उर्फ माले (२७, रा. फर्नांडीसवाडी, उपनगर) असे बेड्या ठोकण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटकाव करण्याचे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या विशेष पथकाचे सहायक निरीक्षक हेमंत नागरे यांना संशयित रोहित हा इंदिरानगर परिसरातील चेतनानगर परिसरास असल्याची खबर मिळाली होती.
वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या सूचनेप्रमाणे, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार बाळा नांद्रे, चंद्रकांत बागडे, विठ्ठल चव्हाण, गणेश वडजे, अर्चना भड, दत्तात्रय चकोर, देवकिसन गायकर आणि भूषण सोनवणे यांच्या पथकाने सापळा रचून सराईत गुन्हेगार माले याच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा केला जेरबंद:
विशेष पथक सराईत गुन्हेगार रोहितच्या माग काढत इंदिरानगर परिसरातील चेतनानगरमधील राज टॉवर याठिकाणी पोहोचले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोसायटीला वेढा घालत संशयित रोहितवर पाळत ठेवली असता, त्यास पोलिसांचा संशय आला. त्यामुळे त्याने टॉवरच्या तेराव्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून पाइपने थेट टेरेसवर पोहोचला. त्यावेळी टेरेसवरील पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो दुसऱ्या विंगच्या दिशेने पळाला. मात्र, पोलिसांनी सोसायटीला चहुबाजुंनी वेढा घातलेला असल्याने त्यांनी रोहिताचा पाठलाग केला. ही सारी पळापळ पाहून रहिवाशांचीही गर्दी झाली. पोलिसांनी तब्बल दीड किलोमीटरपर्यंत संशयित रोहित याचा पाठलाग करीत त्याच्या मुसक्या आवळून त्यास बेड्या ठोकल्या आहेत.