
नाशिक। दि. १ सप्टेंबर २०२५: पिकअप वाहन अडवून चाकूचा धाक दाखवून व दमदाटी करून फिर्यादीच्या खिशातील २५०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याबाबत २४ मार्च २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नानावली, नाशिक या ठिकाणी पिकअप वाहन अडवून फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून व दमदाटी करून फिर्यादीचे खिशातील २५०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले होते. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पथकाला सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखा, युनिट क्रमांक १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे या गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असतांना पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्या कडुन बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील संशयित आरोपी आवेश खान हा गुमशा बाबा दर्गा जवळ भद्रकाली येथे येणार आहे.
हि माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली. त्यानुसार गुन्हेशाखा युनिट कडील पोलीस हवालदार संदीप भांड, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, मिलींदसिंग परदेशी, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, नाजीमखान पठाण यांच्या पथकाने गुमशा बाबा दर्गा जवळ भद्रकाली येथे सापळा लावला. आणि आवेश आतिक खान (वय- १९ वर्षे, राह. जूने नाशिक, भद्रकाली, नाशिक) यास ताब्यात घेवून त्यास गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. सदर गुन्हयातील आरोपीताची वैदयकीय तपासणी करून त्यास गुन्हयाचे तपासकामी भद्रकाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
![]()

