
नाशिक। १ जुलै २०२५: मालकाचे १० लाख रुपये चोरून फरार झालेला मूळचा राजस्थानातील चालक अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. गुन्ह्याच्या तपासासाठी राज्याच्या सीमेवर शोध घेतलेल्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ नाशिक शहरच्या पथकाने, शेवटी मंगरूळ फाटा (ता. चांदवड) येथे सापळा रचून आरोपीस त्याच्या साथीदारासह अटक केली. दोघांकडून रोख १० लाखांची चोरी गेलेली रक्कम आणि चोरीत वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.
गुन्हा दिनांक ११ जून २०२५ रोजी दुपारी घडला होता. नाशिक रोड येथील मोटवाणी रोडवरील दत्त मंदिर परिसरातून फिर्यादी विनोद अशोक कंदोई यांच्याकडे कमला असलेला चालक जगतपाल बुधराम सिंग (२४, रा. हनुमानगड, राजस्थान) याने त्याच्या साथीदार सुशिल भाट (२२) याच्या मदतीने १० लाख रुपये रोख व स्प्लेंडर मोटारसायकल चोरून पलायन केल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
पोलिस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस मंगरूळ फाटा परिसरात गुप्त माहितीच्या आधारे थांबले होते. पोलीस हवालदार महेश साळुंके व अंमलदार राहुल पालखेडे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की आरोपी चांदवडमार्गे नाशिकमध्ये परत येणार आहेत. लगेचच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस अंमलदार: राहुल पालखेडे, नितीन जगताप, राम बर्डे, आप्पा पानवळ, चालक पोलीस हवालदार सुकाम पवार यांच्या पथकाने मंगरूळ फाटा येथे सापळा लावला.
स्प्लेंडर मोटारसायकल (MH 15 JS 1478) वरून आलेल्या दोन तरुणांना थांबवून ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपली नावे जगतपाल बुधराम लालर आणि सुशिल शिशपाल राव, दोघेही सध्या राहणार टाकळी रोड नाशिक रोड असे सांगितले. चौकशीत जगतपाल याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्याकडून १०,००,००० रुपये रोख, मोटारसायकलसह एकूण १०.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.