नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आर. टी. वो. कॉर्नर रासबिहारी लिंक रोडवरील औदुंबर लॉन्स जवळील मोकळ्या पटांगणात रविवार (ता.१५) रोजी एका युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रथम दर्शनी दगडाने ठेचून खून केल्याचे समोर येत आहे. प्रशांत अशोक तोडकर, (वय २८, रा आदर्श नगर, रामवाडी, पंचवटी, नाशिक) असे मयताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामवडी येथील आदर्श नगर येथील अठ्ठावीस वर्षीय प्रशांत तोडकर हा सी. बी. एस. ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. दररोज नित्य नियमाने कामास निघणारा प्रशांत शनिवारी (ता.१५) रोजी दिवसभर घरी होता. मात्र, रात्री घरा बाहेर पडला होता.
रविवार (ता.१६) रोजी प्रशांत यांचा मृतदेह हा आर टी वो कॉर्नर रासबिहारी लिंक रोडवर सकाळी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे व गुन्हे शोध पथक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
तसेच पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड हे घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी प्रशांत यांची रिक्षा क्रमांक एम एच १५ ई एच ३५१७ या ठिकाणी होती व आजू बाजूला दारूच्या बाटल्या व ग्लास आढळून आले.
सदर खून मद्यपान करताना किंवा त्या नंतर झाल्या असल्याची माहिती प्रथम दर्शनी आढळून आली आहे. मयत युवकाचा पश्चात दोन भाऊ, एक बहिण, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेने परिवार हादरला असून रामवाडी परिसरात एकच शोककळा पसरली होती.