नाशिक (प्रतिनिधी): कालिका मंदिरामागे असलेल्या सहवासनगरमध्ये एका 20 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अवघ्या बारा तासांच्या आत पाच आरोपींनी बेड्या ठोकल्या असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रवीण भालेराव याचे एक वर्षापूर्वी हळदीच्या कार्यक्रमात काही मुलांशी वाद झाले होते.
मयत पियुष भीमाशंकर जाधव (वय20) हा नेहेमी प्रवीण भालेराव सोबत असायचा. काल रात्री नेहेमीप्रमाणे प्रवीण हा आपल्या घराजवळ बसलेला असताना प्रवीण पुंडलिक निंबारे (वय 19), रोशन भगवान माने (वय 22), अजय संतोष शिंदे (वय 19), देव वाघमारे (वय 19), आदित्य राजू महाले (वय 20) व इतर पाच जण हे तेथे धारदार शस्त्र घेऊन आले.
जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांनी पियुषच्या छातीवर, डोक्यावर, पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने पियुषचा मृत्यू झाला. घटना घडल्यापासून आरोपी फरार झाले होते. त्यापैकी पाच जणांना मखमलाबाद परिसरातील भोर मळा येथून गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पुढील तपासासाठी अटक केलेल्या सर्व आरोपींना मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हा घडल्यापासून 12 तासांच्या आत हल्लेखोरांचा शोध लावल्याने गुन्हे शाखेच्या विशेष शाखेचे कौतुक होत आहे. सर्व आरोपी हे 19 ते 22 या वयोगटातील असून, सर्व कालिका माता मंदिराच्या मागील परिसरातील राहणारे आहेत. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
सदरची कामगिरी, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विशेष पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार भामरे, पोलीस अंमलदार: योगेश सानप, बाळासाहेब नांद्रे, निकम, चंद्रकांत बागडे, अनिरुद्ध येवले, गणेश वडजे, रोकडे, पोलीस नाईक: कोल्हे, भूषण सोनवणे या टीमने बजावली !