नाशिक: अंबडमध्ये घरात सापडला गांजाचा साठा; संशयिताला अटक

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरात वारंवार अंमली पदार्थ सापडतो आहे. अंबड परिसरातील एका घरामध्ये साठा करण्यात आलेला सुमारे ११ किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला आहे.

शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून गांजाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली आहे. यश उर्फ बाज्या राजेंद्र पाटील (२५, रा. फ्लोरा फाऊंटन, अंबड-लिंक रोड, अंबड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

शहर गुन्हेशाखेच्या पथकाकडून आयुक्तालय हद्दीमध्ये सातत्याने गस्त घालत अंमलीपदार्थांविरोधी कारवाई केली जात आहे. गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार विशाल काठे यांना अंबड परिसरामध्ये चोरीछुप्या रितीने गांजा विक्री सुरू असल्याची खबर मिळाली होती. युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना माहिती दिल्यानंतर, सोमवारी (ता. ८) रात्री अंबड परिसरातील अंबड लिंकरोडवर सापळा रचण्यात आला.

हे ही वाचा:  नाशिक: पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात होणार अंशतः वाढ

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट एकच्या पथकाने फ्लोरा टाऊनमधील पदमश्री रो हाऊसमधील १२ क्रमांकांच्या रोहाऊसवर छापा टाकला. अचानक झालेल्या कारवाईत पोलिसांनी घरझडती घेतली असता, त्यावेळी घरामध्ये ११ किलो ६५० ग्रॅम वजनाचा गांजा पथकाच्या हाती लागला. संशयित बाज्या याने गांजा साठा करून ग्राहकांना चोरीछुप्या विक्री करीत असल्याची कबुली दिली.

मोबाईल व गांजा असा १ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक श्रीवंत, रवींद्र बागुल, विशाल काठे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाझीम खान पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, अप्पा पानवळ, समाधान पवार यांनी बजावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790