खासगी सावकार दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल !
नाशिक (प्रतिनिधी): ५ लाख ९ हजार रुपये १० ते २० टक्के व्याजाने देऊन मुद्दल व व्याजासह ४२ लाख रुपये घेऊन सुद्धा अधिक ७ लाखांची मागणी करणाऱ्या खासगी सावकार दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी उन्नती योगेश जैन (वय ३४, रा. साई संस्कृती अपार्टमेंट, म्हसरूळ, नाशिक) या महिलेने अवैध सावकारी करणाऱ्या तसेच सावकारीचा कुठलाही परवाना नसलेल्या संशयित आरोपी मंगला अहिरे ऊर्फ मंगला गायकवाड, तिचा पती दीपक गायकवाड (दोघेही रा. साईशिल्प अपार्टमेंट, शिवगंगानगर, म्हसरूळ), मामा भोजूसिंग गिरासे व काका (दोघेही रा. नाशिक) यांच्याकडून ५ लाख ९ हजार २०९ रुपये कर्जाऊ घेतले होते.
त्या बदल्यात मार्च २०२२ ते १३ मार्च २०२४ या कालावधीत फिर्यादी जन यांनी मूळ मुद्दल, तसेच दरमहा साधारण १० ते २० टक्क्यांप्रमाणे व्याज दिले, तसेच त्यावरील दंड यासाठी २३ लाख ५४ हजार ८०५ रुपये इतकी रक्कम खासगी सावकार मंगला गायकवाड व दीपक गायकवाड यांनी स्वीकारली. मात्र आरोपी गायकवाड दाम्पत्याने फिर्यादी उन्नती जैन यांच्याकडून १८ लाख ४५ हजार ५९६ रुपयांची अतिरिक्त रक्कम बळजबरीने वसूल केली.
त्यानंतर पुन्हा ७ लाख रुपयांची मागणी केली; मात्र फिर्यादी जैन यांच्याकडे ही रक्कम नसल्याने गायकवाड दाम्पत्याने जैन यांच्याकडे राहत्या घराच्या मालकीबाबतच्या कागदपत्रांची मागणी केली, तसेच गायकवाड यांच्यासह भोजूसिंग गिरासे व काका नामक व्यक्तीने जैन यांच्या घरी येऊन सात लाख रुपयांची मागणी केली, तसेच जैन यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार मार्च २०२२ ते दि. १३ मार्च २०२४ या कालावधीत फिर्यादी जैन यांच्या घरी घडला. खासगी सावकार दाम्पत्याकडून वारंवार होणाऱ्या दमबाजीला कंटाळून अखेर त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील, तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत. म्हसरूळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक: १२८/२०२४