नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): महिलेशी मैत्री केल्यानंतर तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही म्हसरूळ परिसरात राहते. आरोपी विवेक यग्यनारायण बोहोरा (रा. करोलिया मार्ग, गीता भवन, बस्ती, जैतरण, जि. ब्यावर, राजस्थान) याचा या महिलेशी व्हॉट्सॲपद्वारे परिचय झाला.
त्यानंतर आरोपी विवेक बोहोरा हा तिच्या घरी गेला. त्याने काही तरी गुंगी आणणारा पदार्थ पिण्यासाठी देऊन तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यादरम्यान त्या संबंधाचे व्हिडिओ व फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली, तसेच शिवीगाळ व मारहाण करून या महिलेवर पुणे, सोमेश्वर, मुंबई, गांधीनगर, चिलोडा व फिर्यादीच्या घरी वेळोवेळी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विवेक बोहोराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हाके करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ८१/२०२४)