नाशिक। दि. ११ ऑक्टोबर २०२५: सातपूरच्या आयटीआय सिग्नल येथील एका बारमध्ये करण्यात ओलेल्या गोळीबारप्रकरणी कोठडीत असलेल्या तिघांना पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. संशयित शुभम पाटील उर्फ भुरा, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजीत अडांगळे अशी त्यांची नावे आहेत.
या तिघांची कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ केली. दरम्यान, या प्रकरणी लोंढे पिता-पुत्रांची रवानगीही कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणी सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांच्या फिर्यादीनुसार, भूषण लोंढे, शुभम पाटील उर्फ भुरा, प्रिन्स सिंग, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजीत अडांगळे, राहुल गायकवाड, सनी विठ्ठलकर, शुभम निकम, वेदांत चाळगेसह पाच अज्ञात संशयितांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
त्यापैकी गोळी झाडणारा शुभम याच्यासह दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजीत अडांगळे यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक उर्फ नाना लोंढे यांचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने, त्यांना बेड्या ठोकल्या होत्या. या पिता-पुत्रांसह अन्य दोघांना गुरुवारी (दि.९) न्यायालयात हजर केले गेले असता, त्यांना रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
त्यामुळे या प्रकरणी अटकेत असलेले सर्वच संशयित आरोपी रविवारपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. राजकीय दहशत निर्माण करून गुन्हेगारांना बळ देणारे सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर पोलिसांना कारवाईसाठी फ्री हॅन्ड दिलेला आहे. “नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला ‘राजाश्रय’ देणाऱ्यांना कठोरपणे मोडून काढा, असे निर्देश पोलीस आयुक्तांना देताना, मी त्यांना पूर्णतः मोकळीक दिली आहे. कुणी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला पाठीशी घालू नका, मग तो भाजपाचा असला तरीही त्याच्यावर कारवाई करा. कुणाचा भूतकाळ काय आहे याचा विचार न करता, तो जर आता गुन्हेगारीत असेल तर त्याची गय करू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
![]()

