नाशिक। दि. १० जुलै २०२५: शेतकऱ्याला अडवून चार जणांनी ही रक्कम बळजबरीने हिसकावून चोरून नेल्याची घटना मार्केट यार्ड, दिंडोरी रोड येथे मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली.
फिर्यादी सूरज इंदलसिंग ब्रह्मणावत (रा. जयपूरवाडी, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) हे दिंडोरी रोडवरील भाजीपाला मार्केट येथे रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास वांगी व कारली विकून मिळालेले २१ हजार रुपये पँटच्या खिशात ठेवून रिकामे कॅरेट पिकअप गाडीत ठेवत होते. त्यावेळी चार अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. दारू पिण्यासाठी पैसे दे, असे ते म्हणाले; मात्र यावर सूरज यांनी “कसले पैसे” असे विचारले आणि पैसे दिले नाहीत म्हणून चारपैकी एका इसमाने त्याची कॉलर पकडून त्यांना मारहाण करून खाली पाडले.
नंतर दोन इसमांनी त्याचे हात पकडले व अन्य एका इसमाने त्यांच्या पँटच्या खिशातील २१ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. त्यांनी आरडाओरडा केला असता त्यांना दगड मारून दुखापत केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चौघांपैकी संशयित शिवा ऊर्फ गुंग्या रघुनाथ वळवी (रा. कालिकानगर, पंचवटी) याला अटक करण्यात आली आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३४२/२०२५)