नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर दक्षतेचा उपाय म्हणून महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी आरोग्य-वैद्यकीय विभागाची तातडीची बैठक घेत नाशिकरोड येथील स्व. बाळासाहेब ठाकरे (नूतन बिटको) रुग्णालय तसेच जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान नाशिकमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण अजून तरी नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये मात्र काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत शहरातील चार लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र नंतर ज्वर ओसरला. आता केरळला कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळून आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय व कुटुंबकल्याण मंत्रालय तसेच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने उपायोजना सुचवल्या.
त्यानुसार आयुक्त डॉ. करंजकर यांनी आरोग्य वैद्यकीय विभागाची तातडीची बैठक घेत कोरोनाकरिता राखीव बेड, ऑक्सिजन व्यवस्था तसेच औषधसाठ्याचा आढावा घेतला. बिटको व झाकीर हुसेन रुग्णालयात आऑक्सिजन प्लांट सुस्थितीत आहे की नाही त्याची तपासणी करत विशेष कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.