नाशिक (प्रतिनिधी): रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांचे दागिने चोरणारी परप्रांतीयांची टोळी गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. अटक केलेले तिघे संशयित उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील नगिना तालुक्यातील आहेत. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट १ ने हि कामगिरी केली आहे.

ठक्कर बाजार ते सीबीएस सिग्नल दरम्यान प्रवासी महिलेला लुटण्याचा प्रकार उघडकीस आल्यावर या टोळीचा पर्दाफाश झाला.
साजिद वाजीज अली (३९, अब्दुलापूर), मुस्तीकीन बंदू पस (३९, गौसपूर, ता. नगीना), सोनू ऊर्फ मोहमंद आबिद महंमद हुसेन (२८, सबदलपूर, उत्तर प्रदेश), अशी संशयितांची नावे आहेत.
शुक्रवारी (ता. १४) साडेपाचला महिला ठक्कर बाजार बसस्थानकातून सीबीएस सिग्नल दरम्यान रिक्षातून प्रवास करीत असताना तिच्यासोबत रिक्षात बसलेल्या अनोळखी व्यक्तीनी तिच्या बॅगेतील ५ हजाराची रोकड आणि २ सोन्याच्या बांगड्या चोरल्याचे महिलेच्या लक्षात आल्यावर महिलेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
शहर पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करीत असताना त्यांना हे सगळे संशयित उत्तर प्रदेशातील असून, नाशिक पुणे महामार्गावरील फेम चित्रपटगृहाजवळील लोंढेज गेस्ट हाउस येथे थांबलेले असल्याची माहिती मिळाली.
गुन्हे शाखेच्या पथकाने लोंढेज गेस्ट हाउस येथे जाऊन संशयितांना अटक केली. ते सगळे जण उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील नगीना तालुक्यातील असल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांच्याकडून १५ हजार ५०० रुपये रुपयाची रोकड आणि ५७ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल असा सुमारे ३ लाख ४१ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, विष्णू उगले, रवींद्र बागूल, येवाजी महाले, संदीप भांड, प्रवीण वाघमारे, नझीम पठाण, पो. ना. प्रशांत मरकड, शरद सोनवणे आदीच्या पथकाने ही कामगिरी केली.