नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
कॉलेजच्या लेखा परीक्षणामध्ये प्रकार उघडकीस; गंगापूर पोलिसांत गुन्हा
नाशिक (प्रतिनिधी): महाविद्यालयात शिपाई असलेल्या इसमाने महाविद्यालयाच्या नावाचा वापर करत विद्यार्थी, पालकांना महाविद्यालयाच्या बँक खात्याचा नंबर न देता विविध शैक्षणिक फीची जमा झालेली रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग करत ४४ लाख ८ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये उघडकीस आला. गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास भास्कर आहेर असे या संशयित शिपायाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि कमांडंट संदीप पुरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मे ते डिसेंबर २०२३ या सात महिन्याच्या कालावधीत महाविद्यालयात शैक्षणिक प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु असताना महाविद्यालयातील लेखा विभागात शिपाई पदावर कार्यरत असलेला विलास भास्कर आहेर याने स्वतःचे बँक खाते महाविद्यालयाचे असल्याचे भासवत विद्यार्थी व पालकांकडून जमा केलेली शैक्षणिक फी स्वतःच्या खात्यात वर्ग केली.
काही विद्याथ्यांची फी जमा न झाल्याने महाविद्यालयाने विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी फोन पे द्वारे फी जमा केल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या लेखा परीक्षणामध्ये हा प्रकार उघडकीस आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार केली. वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. दरम्यान, या संशयित शिपायाने यापूर्वीही अपहार केल्याचा संशय असून व्यवस्थापनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. (गंगापूर पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १६४/२०२४)