Nashik Breaking: दुभाजक तोडून आयशरची कारला धडक; चार जण जागीच ठार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई आग्रा हायवेवर चारचाकी कार आणि आयशर गाडीचा भीषण अपघात झाल्याने चारचाकी गाडीमध्ये असलेल्या चौघांचा जागीच मुत्यू झाला. तर आयशर चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई आग्रा महामार्गावरून नाशिककडून आडगावकडे कोंबड खत वाहतूक करणारी आयशर ट्रक गुरुवारी (दि. 11 जुलै) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मद्यपी चालक सुसाट चालवत होता. याचवेळी आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो महामार्गाच्या विरुद्ध बाजूला गेला. आयशर ट्रक (एम.एच.15 जीव्ही 9190) दुभाजकावर चढून थेट विरुद्ध बाजूच्या नाशिक लेनवर जाऊन धावत्या ब्रिजा कारवर (एम. एच 05 डीएच 9367) आदळला.

हे ही वाचा:  नाशिक: दिवाळीनिमित्त एसटीच्या अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन

हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील चौघे प्रवाशी जागीच ठार झाले. ट्रक चालक व क्लीनर जखमी झाले आहेत. आडगावकडून नाशिककडे येणारी ब्रिजा कार संपूर्ण चक्काचूर झाली आहे. या कारमध्ये प्रवासी होते हे सगळे मृत्युमुखी पडले. कारचा चेंदामेंदा झाल्याने नाशिक अग्निशमन दलाची मदत मागविण्यात आली. कोणार्कनगर विभागाचे बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले.

हे ही वाचा:  नाशिक: स्टेट बँकेच्या नाशिकरोड शाखेत २५ लाखांची चोरी

जवानांकडून कारचा पत्रा कापून मृतदेह काढण्यात आले. या अपघातात रहेमान सुलेमान तांबोळी (४८), अरबाज चंदुभाई तांबोळी (२१, दोघे. रा. लेखानगर सिडको), सीज्जू पठाण (४०,रा.इंदिरानगर), अक्षय जाधव (२४, रा. श्रध्दा विहार, इंदिरानगर) यांचा मृत्यू झाला. तर आयशर ट्रकचालक बापू अहिरे आणि सचिन म्हस्के हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सायबरसह आर्थिक गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष ज्ञान प्राप्त करावे- अपर पोलिस महासंचालक नवल बजाज

भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असल्याने हे सगळे जण सटाणा येथे गेले होते. तेथून व्यवसाय आटोपून घराकडे नाशिकच्या दिशेने परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली. चौघांवर काळाने झडप घेतली. या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच शासकीय जिल्हा रुग्णालयात नातेवाईक, मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790