नाशिक (प्रतिनिधी): पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अनेकांकडून पैसे उकळणे, सोशल मीडियावर पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशातील फोटो अपलोड करण्यासह दमदाटी करणाऱ्या बोगस पोलीस अधिकारी नवऱ्याची पोलखोल त्याच्या पत्नीनेच केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात संशयित पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीच्या फिर्यादीनुसार, दोघांचा २०१७ मध्ये प्रेमविवाह झालेला आहे. संशयित पती सागर विष्णू पवार याने लेबर कॉन्ट्रॅक्टरचे काम करीत असल्याचे पत्नीला खोटेच सांगितले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी संशयित सागर हा सोशल मीडियावर पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशातील फोटो अपलोड करायचा. तसेच घरातील कपाटामध्ये सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकची नेमप्लेट पत्नीच्या हाती लागल्या.
याबाबत जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत पत्नीला त्याने मारहाणही केली. त्यानंतर चौकशी केली असता, संशयित शहरात अनेकांना पोलीस अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याकडून पैसे घेत होता. तसेच, अनेकांना दमदाटी करीत खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसेही उकळत असल्याचे समोर आले होते.
यासंदर्भात पत्नीने पतीला समजाविण्याचा प्रयत्न करूनही तो ऐकत नव्हता. उलट त्याने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पत्नीने अंबड पोलिसात धाव घेत तक्रार दिली असून, त्यानुसार संशयित सागर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. जी. टोपले हे तपास करीत आहेत.