कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन; या मोठ्या हॉस्पिटलला बजावली मनपाने नोटीस !

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपाने या मोठ्या हॉस्पिटलला नोटीस बजावली आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक मधील अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल वडाळा रोड येथे अचानक पाहणी केली असता त्याठिकाणी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्या हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी दिली.

शहरातील मोठ्या मोठ्या रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत, तसेच सदरच्या मोठ्या रुग्णालयात मनपाच्या ८० टक्के आरक्षित जागेवर स्वतःचे पेशंट कोणतीही पूर्वसूचना न देता भरती करीत असून एकूण सर्व उपलब्ध बेडची माहिती लपवत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे अशा अत्यंत हलाखीच्या कोविड-१९ च्या परिस्थितीमध्ये सर्व प्रकारचे बेड त्या त्या रुग्णांना वेळेत उपलब्ध होण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी सर्व मोठ्या रुग्णालयांची तपासणी करण्याचे निश्चित केले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

या अनुषंगाने शहरातील खाजगी हॉस्पिटलची पाहणी करून कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन केले जाते की नाही याबाबत पडताळणी मनपाच्या पथकाकडून केली जात आहे. या अनुषंगाने वडाळा रोड येथील अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल येथे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे व सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांच्या पथकाने पाहणी केली असता त्या ठिकाणी मनपाच्या सी बी आर एस सिस्टिम मध्ये कोविड रुग्णांची माहिती अपडेट केली जात नसून त्यामध्ये बरीच तफावत असल्याचे आढळून आले आहे.

नाशिक मनपाच्या रिझर्व्ह बेड प्रमाणे कोविड रुग्णाची भरती मनपाच्या सी बी आर एस सिस्टिम वरून देण्यात येणाऱ्या टोकन प्रमाणे होत नसल्याचेही निदर्शनास येत आहे. रुग्णाच्या बिलावर ऑडिटरचा शेरा सही शिक्का नाही तशी नोंद असलेली नस्ती मिळून आली नाही. नाशिक मनपाच्या बिलाबाबतचा फलक हा रुग्णालयात दर्शनी भागात न लावता चुकीच्या जागी लावण्यात आलेला आहे. कोरोना रुग्ण दाखल करतेवेळी वैयक्तिक संरक्षक साधने सँनिटायझर, सोशल डिस्टंसिंग पाळले जात नसल्याचे आढळून आले तसेच रुग्णालयात एकूण  २११ खाटांवर रुग्ण दाखल होते त्यामध्ये कोविडचे १५४ रुग्ण व नॉन कोविडचे  ५७ रुग्ण दाखल होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णालयातील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा म्हणजे १८० खाटा कोविड रुग्णासाठी आरक्षित करण्यात याव्यात. तसेच या रुग्णालयात दाखल होणाऱ्या ८० टक्के कोविड रुग्णांची देयके आकारणी (बिल) शासनाच्या नियमानुसार घेण्यात यावी व त्याबाबत मनपास स्पष्टीकरण देण्याबाबत कळविण्यात आले आहे.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

तसेच मनपाच्या सी बी आर एस सिस्टीम वर नोंद होवून टोकन जनरेट झाल्या शिवाय मनपाच्या ८० टक्के आरक्षित बेडवर कोणताही रुग्ण दाखल करण्यात येऊ नये तसेच सी सी बी आर एस सिस्टिम वर नोंद झाल्यानंतर सदर रुग्ण रुग्णालयात दाखल झालेला आहे असे समजण्यात येईल असे या नोटीस द्वारे स्पष्ट करण्यात आले आहेत यावरील त्रुटींबाबत आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि शासनाच्या प्रत्येक प्रचलित नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे या नोटिशीत नमूद आहे.

तरी सर्व खाजगी रुग्णालयानी कोरोना बाबतचे व शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन मनपाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी केले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here