नाशिकच्या सेवेत कपात करून छ. संभाजीनगरला विमानसेवा
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या विमानसेवेमध्ये कपात करत इंदूरनंतर आता गोवा आणि नागपूरसाठीचे विमान छत्रपती संभाजीनगरला वळविण्यात आले आहे. २ जुलैपासून सप्ताहातील सातऐवजी आता केवळ चारच दिवस ही सेवा नाशिककरांना मिळणार आहे.
मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस छत्रपती संभाजीनगर येथून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. नाशिककरांना रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ही सेवा उपलब्ध असेल, त्याची वेळ मात्र पूर्वीप्रमाणेच कायम आहे.
नाशिक विमानतळावरून सध्या अहमदाबाद, हैदराबाद, दिल्ली, नागपूर, इंदूर या शहरांसह गोव्याकरिताही नियमित विमानसेवा सुरू आहे. विशेष म्हणजे सरासरी ८० टक्क्यांवर प्रवाशांची संख्या नियमितपणे असतानाही एका- एका शहरासाठीच्या सेवेत कपात केली जात असून ती छत्रपती संभाजीनगरला वळविली जात आहे.
यामागे राजकीय दबाव वापरला जात असल्याची तीव्र भावना व नाराजीचा सूर नाशिककरांमध्ये पहायला मिळत आहे. इंदूरसाठीच्या विमानसेवेत यापूर्वीच कपात करण्यात आली असून आता केवळ मंगळवार, गुरूवार आणि शनिवार असे तीन दिवसच ही सेवा आता सुरू आहे. अहमदाबादसाठीही दररोज दोन विमाने होती, त्यापैकी आता केवळ एकच विमान उपलब्ध असून जे सुरू आहे, तेही आता बुधवारी नसते.