नाशिक (प्रतिनिधी): सातपूर औद्योगिक वसाहतीतील इएसडीएस सर्कल येथील रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरवरून दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातामध्ये चालकाचा मृत्यू झाला. दरम्यान, अशास्त्रीय पद्धतीने उभारलेल्या या गतिरोधकामुळे गेल्या काही महिन्यांत चौघांचा बळी गेला आहे.
आदर्श श्रीधरन (२४, रा. एमएचबी कॉलनी, अशोकनगर, सातपूर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श हा कॉलेज रोड परिसरातील कॉल सेंटरमध्ये कार्यरत होता. शुक्रवारी (ता.२७) रात्री साडेदहाच्या सुमारास तो कार्यालयीन कामकाज आटोपून दुचाकीवरून घरी जात होता.
सातपूर एमआयडीसीतील इएसडीएस सर्कल येथे असलेल्या गतिरोधकावरून त्याची स्लिप झाली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र शनिवारी (ता.२८) रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास हवालदार आबाजी मुसळे करीत आहेत.
वाट्टेल तिथे गतिरोधक: शहरातील उपनगरीय रस्ते, औद्योगिक वसाहतींमध्ये वाट्टेल त्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. महापालिकेकडे अर्ज केल्यानंतर संबंधित विभागाकडून त्यासंदर्भातील निकषांचे पालन न करता थेट गतिरोधक टाकण्याचे काम केले जाते.परंतु त्याचवेळी स्पीड ब्रेकरच्या अलीकडे सूचना फलक रस्त्यालगत लावला जात नाही. तसेच, अनेक ठिकाणी गरज नसताना स्पीड ब्रेकर टाकल्याने वाहनांचा वेग कमी होण्याऐवजी अपघात मात्र वाढले आहेत. आहे ते स्पीड ब्रेकर चुकीच्या पद्धतीने, रुंदी-उंचीतही बदल असल्याने वाहनांचेही नुकसान होत असल्याचा आरोप केला जात आहे.