नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा येथे सलग दुसऱ्या दिवशी अपघात घडला. शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी ६ वाजता टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बापू काशीराम चौरे (वय: ५४) यांचा मृत्यू झाला. टँकरचालकावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होत होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाथर्डी फाटा येथे टँकरचालकाने चौरे यांच्या अॅक्टिवा दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील चौरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात टँकरचालक सुदाम साठे (वय: ४४, राहणार: पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारीही (दि. २६) येथे अपघातात तरुणाचा जीव गेला होता. तरीही पोलिसांनी दुसऱ्या दिवशी कर्तव्यदक्षता दाखवली नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या रस्त्यावर ४ ते ८ या वेळेत अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.