नाशिक (प्रतिनिधी): पेठरोडवरील राहू हॉटेलपासून काही अंतरावर भरधाव वेगातील मिक्सर ट्रकने धडक दिल्याने रस्त्याच्याकडेला थांबलेले दोघे ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संशयित मिक्सर ट्रकचालक पसार झाला आहे.
गोवर्धन गोसावी (रा. पुलेनगर, विजय चौक, पेठरोड), पांडु लाखन (रा. वडुली, ता. कपराडा, जि वलसाड, गुजरात) असे अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.
विनायक ढवळू पवार (रा. राजबारी, पेठ) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. २६) सायंकाळी सहाच्या सुमारास पेठरोडवरील वेरुळकर बंगल्याजवळ रस्त्याच्या कडेला छोटा हत्तीतून (एमएच १५ इजी १८४७) भाजीपाला खाली उतरवून चालक गोवर्धन गोसावी यांना पांडू लाखन हे भाड्याचे पैसे देत होते.
त्यावेळी नाशिककडून पेठ रोडकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील मिक्सर ट्रकने (एमएच १५ एचएच ६२८४) रस्त्याच्या कडेला असलेले गोसावी, पांडु लाखन व गंगाराम ओतार यांना जोरदार धडक दिली. तसेच छोटा टेम्पोलाही धडक दिली. या अपघातामध्ये गोसावी व पांडु लाखन हे गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. संशयित मिक्सर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक बळवंत गावित हे तपास करीत आहेत.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790