नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मखमलाबाद शिवारातील मानकर पेट्रोलपंप भागात भरधाव मालवाहू पिकअपने धडक दिल्याने दुचाकीवर डबलसिट प्रवास करणारी ४५ वर्षीय महिला ठार झाली. या अपघातात मृत महिलेचा पती जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत पसार झालेल्या पिकअप चालकाविरूध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंजूळाबाई मोतीराम मांडवे (४५) असे मृत महिलेचे नाव असून या अपघातात मोतीराम अबाजी मांडवे (५५ रा.गंगावाडी,एकलहरा) हे जखमी झाले आहेत. मांडवे दांम्पत्य मंगळवारी (दि.२३) मखमलाबाद शिवारात गेले होते. सायंकाळच्या सुमारास ते आपल्या घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. मांडवे दांम्पत्य दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना मानकर पेट्रोल पंप परिसरात पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १४, ७५०५ या मालवाहू पिकअपने दुचाकीस धडक दिली.
या अपघातात पाठीमागे बसलेल्या मंजळाबाई मांडवे या रस्त्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला तर पती मोतीराम मांडवे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पिकअप चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत सागर मांडवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक हाके करीत आहेत.