नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गोविंदनगर रस्त्यावरून दुचाकीस्वार जात असताना त्यांच्या अंगावर झाड कोसळल्याने त्यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री १०.४५ ते ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
बेलतगव्हाण येथील विशाल राजू दोंदे (२२) आणि प्रशांत बाळू दोंदे (३४) हे दोघे दुचाकीवरून (एमएच १५ एचएफ ९५५७) सिटी सेंटर मॉलकडून इंदिरानगर बोगद्याच्या दिशेने जात होते.
गोविंदनगरजवळच्या क्वालिनो पार्कसमोरून जात असताना एक झाड त्यांच्यावर कोसळले. मागे बसलेल्या प्रशांतच्या डोक्यावरच झाड कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी पडल्याने विशाल गंभीर जखमी झाला आहे. नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. झाड रस्त्यातून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अधिक तपास मुंबईनाका पोलिस करीत आहेत.