नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एका हॉटेलमधून मंगळवारी (दि. ९) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास स्वयंपाकाची कामे आटोपून घराकडे निघालेल्या पादचारी महिलेला सुसाट कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत अर्चना किशोर शिंदे (३१, रा. हनुमाननगर, शिवाजीनगररोड) या जागीच ठार झाल्या. गंगापूर पोलिसांनी कारचालक देवचंद तिदमे (५१, रा. ध्रुवनगर) यास त्याच्या घरातून ताब्यात घेतले. तिदमे याने अपघातवेळी मद्य प्राशन केल्याचे वैद्यकीय चाचणीअंती आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
पुणे, मुंबईपाठोपाठ नाशिकमध्येही मद्यधुंद कारचालकाने ‘हिट ॲन्ड रन’च्या घटनेत महिलेचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महिलेला धडक दिल्यानंतरसुद्धा कारचालकाने कारचा (एमएच ०३ बीई ६६३४) वेग कमी केलेला नव्हता, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी पथकासह धाव घेतली.
अर्ध्या तासात चालकाला घेतले ताब्यात:
जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डोक्याला गंभीरपणे दुखापत झाल्याने त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता एका जागरूक नागरिकाने अचूकपणे अपघातग्रस्त कारचा संपूर्ण क्रमांक टिपलेला होता, तो त्याने पोलिसांना दिला. यावरून पोलिसांनी पत्ता शोधून अर्ध्या तासात देवचंद तिदमे यास राहत्या घरातून ताब्यात घेतले.
संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघातानंतर कारचालक थांबण्याऐवजी सुसाट निघून जात असल्याचेही फूटेजमध्ये दिसते. हे फूटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड व्हायरल झाले आहे.
हा या गुन्ह्याच्या दोषसिद्धीसाठी महत्त्वाचा परिस्थितीजन्य पुरावा ठरू शकतो, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी सांगितले. चालक तिदमे याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत गंगापूर पोलिस ठाण्यात सुरू होती. चाचणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यामध्ये चालकाने मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले आहे. असे गंगापर पोलिसांनी सांगितले.