नाशिक: द्वारका उड्डाणपूलावरील अपघातप्रकरणी ट्रकचालकासह मालकाला ठोकल्या बेड्या

नाशिक (प्रतिनिधी): द्वारकाजवळ उड्डाणपुलावर रविवारी (दि.१३) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताला कारणीभूत ठरलेल्या सळईची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकासह, ट्रकमालक आणि सळई कंपनी मालकाला भद्रकाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ट्रकचालक समीर शहा (२७, रा. अंबड), अशोककुमार यादव (४१, रा. चुंचाळे), मनोजकुमार मेहरचंद (४५, रा. द्वारका) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. टेम्पोचालक अभिषेक गुंजाळ (४८) हादेखील गंभीर जखमी झाला असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धार्मिक कार्यक्रमासाठी महिला, पुरुष व युवक तीन टेम्पोतून रविवारी (दि.१३) धारणगावाकडे गेले होते. लहान टेम्पो (एम. एच१५ एफ. व्ही ५६०१) पाठीमागून लोखंडी सळ्यांच्या ट्रकवर (एम. एच२५ यू ०५०८) जाऊन आदळला. सिडकोकडे परतताना द्वारका चौकाच्या अलीकडे उड्डाणपुलावर ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत सोमवारपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला तर चौदा जण जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: द्वारका उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार; १३ जखमी

सोमवारी यादव व मनोजकुमार मेहरचंद यांना भद्रकाली पोलिसांनी जिल्हा न्यायालयापुढे हजर केले. दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या तिघांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह मोटारवाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातग्रस्त ट्रकमधील सळ्यांचा साठा दुसऱ्या ट्रकमध्ये टाकून सोमवारी घटनास्थळाहून आरटीओकडून ट्रक हलविण्यात आला.

चार फुटांपर्यंत सळया बाहेर:
जुनाट झालेल्या सहाचाकी आयशर ट्रकमध्ये सुमारे २० ते २२ टन इतक्या वजनाचा लोखंडी सळयांचा माल भरून उड्डाणपुलावरून असुरक्षित पद्धतीने वाहून नेला जात होता, असे पोलिसांनी फिर्यादीत म्हटले आहे. या लोखंडी सळया ट्रकच्या चेसीजच्या सुमारे चार फुटांपर्यंत बाहेर आलेल्या होत्या. तसेच कुठल्याही प्रकारचे लाल झेंडे किंवा रेडियम, रिफ्लेक्टर, कापड लावलेले नव्हते, असा ठपका चालकासह दोन्ही मालकांविरुद्ध ठेवण्यात आला आहे. ट्रकचालकाने उड्डाणपुलावर अचानकपणे ट्रकचा ब्रेक दाबून वेग कमी केला होता, असे भद्रकाली पोलिसांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790