नाशिक, ३० जुलै २०२५: तपोवन परिसरात भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने अचानक रिक्षाला कट दिल्याने रिक्षा पलटी होऊन गंभीर अपघात घडला. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, रिक्षाचालक जखमी झाला आहे. अपघातामुळे रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाद हरी औटे (वय ६३, रा. राजवाडा टाकळीगाव) मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघाताबाबत जखमी रिक्षाचालक संतोष अशोक बर्डे (रा. आगर टाकळी, ता. व जि. नाशिक) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, १८ जुलै रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास बर्डे हे त्यांचे मित्र औटे यांच्यासह एमएच १५ एफयू ८६९६ या क्रमांकाच्या ऑटो रिक्षातूननवीन स्वामी नारायण मंदिराकडून लक्ष्मी नारायण मंदिराच्या दिशेने जात होते. तपोवनमधील कृषी गोशाळा ट्रस्टजवळ मागून आलेल्या भरधाव दुचाकीने अचानक कट दिला. यामुळे संतुलन ढळल्याने रिक्षा दुभाजकावर आदळून उलटली.
या अपघातात रिक्षाच्या मागील सीटवर बसलेले औटे आणि चालक बर्डे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. औटे यांना ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या नाद औटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर या घटनेत बर्डे यांनाही दुखापत झाली आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार राजूळे करत आहेत.