नाशिक। दि. २६ मे २०२५: सातपूरच्या अशोक नगर बस स्टॉप जवळ खाजगी बसने दिलेल्या धडकेत २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात राहणारा मयुर नरेद्र पाटील (२० रा. भाजीमार्केट जवळ,अशोकनगर) हा युवक गेल्या गुरूवारी (दि.२२) सकाळच्या सुमारास महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतून रात्र पाळीची सेवा बजावून आपल्या दुचाकीवर घराकडे जात असतांना हा अपघात घडला होता.
एमएच १८ सीसी ८३२१ या दुचाकीने तो आपल्या घराकडे जात असतांना कार्बन नाक्याकडून सातपूरच्या दिशेने भरधाव जाणा-या एमएच १५ एचएच ६२८५ या खासगी प्रवासी बसने दुचाकीस धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार मयुर पाटील याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी वडिल नरेंद्र पाटील यानी दिलेल्या तक्रारीवरून पसार झालेल्या बसचालकाविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १५१/२०२५)