नाशिक। दि. २४ जुलै २०२५: भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नाशिकरोड येथील उड्डाणपूलावर मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात पाठीमागून येणा-या कंटेनरचे चाक युवकाच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा चेंदामेंदा झाला होता. याप्रकरणी पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
समीर मोहन दाते (वय: २५, रा. सिन्नरफाटा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. दाते बुधवारी (दि.२३) दत्तमंदिरकडून सिन्नरफाटाच्या दिशेने आपल्या मोपेड दुचाकीवर प्रवास करीत होता. यावेळी टाटा कंपनीचे कंटेनर क्रमांक: HR45 – E4190 वरील चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत समीरच्या मोपेडला धडक दिली. या अपघातात समीर याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यास गंभीर दुखापत झाली.
त्याच अवस्थेत त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत पोलीस हवालदार गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कंटेनर चालकाविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३७६/२०२५)