नाशिक। दि. २४ जुलै २०२५: नाशिक शहराच्या दिशेने मंगळवारी (दि.२२) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परतीचा प्रवास करताना कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एलजे १४१६) अंजनेरीजवळच्या बेझे फाट्यावर त्र्यंबकरोडवरील दुभाजकावर जाऊन आदळली. पंकज दातीर (३०), अभिषेक घुले (२८, दोघे रा. अंबड) या दोघा मित्रांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने अंबड गावात शोककळा पसरली आहे.
त्र्यंबकेश्वरला पंकज व अभिषेक हे कारने मंगळवारी सकाळी गेले होते. रात्री ते परतीचा प्रवास करत असताना अचानकपणे कारच्या चालकाचा ताबा सुटला. यामुळे कार दुभाजकावर आदळून कोलांटउड्या खात उलटली. गाडीचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान अपघात झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी फाट्यावर धाव घेत पोलिसांना कळविले.
त्र्यंबकेश्वरचे पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार रूपेश मुळाणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने दोघा जखमींना मोटारीतून बाहेर काढून रुग्णालयात हलविले. दरम्यान रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. अंबड गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मोठी गर्दी लोटली होती.