नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील द्वारका जवळ धावत्या बसमधून पडल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. उघड्या दरवाजातून तोल गेल्याने ही घटना घडली असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोबिज इसाह खान (रा. बैराज, उत्तरप्रदेश) असे मृत बालकाचे नाव आहे. खान कुटुंबिय बुधवारी (दि.२०) भिवंडी येथून उत्तरप्रदेश येथे जाण्यासाठी खासगी ट्रव्हल्सच्या बसमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली.
रात्रीच्या वेळी बस नाशिक मार्गे जात असतांना उघड्या दरवाजातील पायऱ्यांवर मोबिज खान बसला होता. द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस समोरील उड्डाणपूलावरून बस जात असतांना तोल गेल्याने तो धावत्या बसमधून पडला.
या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने भाऊ मेहबुब खान यांनी त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत अमंलदार गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक धाबळे करीत आहेत.