नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जुना गंगापूरनाका ते हनुमानवाडी रस्त्यावरून प्रवास करत असताना चोपडा लॉन्सजवळच्या पुलाच्या अगोदर असलेल्या स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने त्यावरून दुचाकी आदळून घसरली. यावेळी बुधवारी (दि.१७) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भूषण शरद पाटील (33. रा. गणेश चौक, सिडको) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
जुना गंगापूरनाका येथून दुचाकीने (एम.एच.१५ सीक्यू ९०७५) हनुमानवाडीमार्गे पंचवटीत राहणाऱ्या मित्राकडे भूषण जात होता. यावेळी रात्री १ वाजेच्या सुमारास त्याला गतिरोधकाचा अंदाज आला नाही. गतिरोधकावरून गाडी उधळल्याने त्याचा तोल गेला व तो खाली कोसळला, दुभाजकाचा डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच त्याचा भाऊ नितीन पाटील याने धाव घेत जखमी भूषण यास शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले.
भूषण हा नाशिकच्या क्रॉम्टन कंपनीत नोकरी करत होता. तो मूळ जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील रहिवासी होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व सात महिन्यांचा मुलगा आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.
![]()

